युवकांनी स्पर्धा परीक्षांत सहभाग वाढवूनप्रत्येक क्षेत्रातील आव्हाने स्वीकारावीत : उपजिल्हाधिकारी मानसी पाटील

 DNA न्यूज़ गोंदिया, दि.6 फेब्रुवारी : प्रशासनात स्थानिक युवकांचा सहभाग वाढण्यासाठी स्पर्धा परीक्षांकडे अधिक गांभीर्याने वळणे आवश्यक आहे. आजच्या काळात अनेक युवकांचा स्पर्धा परीक्षांशी संपर्क कमी झाला असून ही बाब चिंतेची आहे. जिल्ह्यातील तरुणांनी उच्च पदस्थ स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन प्रत्येक क्षेत्रातील आव्हाने स्वीकारत स्वतःचे करिअर घडवावे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी मानसी पाटील यांनी केले.
    जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने श्री गुरुनानक स्कूलच्या ऑडिटोरियम हॉल येथे आयोजित दोन दिवसीय ‘गोंदिया ग्रंथोत्सव’ अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या. सध्याच्या विविध सामाजिक व प्रशासकीय समस्या युवकांपर्यंत पोहोचवून त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे असून हे कार्य अधिक व्यापक पातळीवर नेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक मुला-मुलींनी प्रशासनात येऊन समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
  कार्यक्रमास तहसीलदार समशेर पठाण, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी रुपेशकुमार राऊत, सहाय्यक संशोधन अधिकारी आशावरी पटवर्धन तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी मीनाक्षी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
   तहसीलदार समशेर पठाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात यश मिळविण्यासाठी स्पष्ट आणि मोठे ध्येय निश्चित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. ध्येय उंच असेल तरच यशही मोठे मिळते. सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि चिकाटीच्या बळावर कोणतीही स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार करता येते, असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.
 या मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, नियोजन, अभ्यास पद्धती व करिअर संधीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post