जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज जयंतीचा शासकीय यादीत समावेश करा*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचे निवेदन DNA न्यूज़।गोंदिया

            DNA न्यूज़।गोंदिया 
जगद्गुरु संत श्री. तुकाराम महाराज यांच्या जयंतीचा समावेश २०२६ च्या शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत तातडीने करण्यात येईल, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले. मा. खासदार श्री सुनीलजी मेंढे यांच्या नेतृत्वाखाली 'सकल कुणबी समाजाच्या' शिष्टमंडळाने नागपूर येथील ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २९ डिसेंबर २०२५ रोजी आगामी वर्षासाठी राष्ट्रपुरुष व थोर संतांच्या जयंती साजरी करण्याबाबतचे परिपत्रक निर्गमित केले आहे. या यादीत ४५ महनीय व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, ज्यांनी आपल्या अभंगवाणीतून जगाला मानवतावादाची शिकवण दिली आणि जे वारकरी संप्रदायाचा ‘कळस’ आहेत, त्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव या यादीत नसल्याने समाजमनात तीव्र संताप व्यक्त होत आहे. "महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत तुकोबांचे स्थान सर्वोच्च आहे. त्यांचे नाव शासकीय यादीतून वगळले जाणे, हा केवळ वारकरी संप्रदायाचाच नव्हे तर समस्त महाराष्ट्राचा अवमान आहे," अशा शब्दांत शिष्टमंडळाने आपल्या भावना व्यक्त केल्या. २९ डिसेंबरच्या परिपत्रकात सुधारणा करून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची जयंती (२ फेब्रुवारी) शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनाची दखल घेताना मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संत तुकाराम महाराजांचे नाव यादीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. तांत्रिक त्रुटी दूर करून त्यांच्या जयंतीचा समावेश त्वरित करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात माजी खासदार सुनील मेंढे यांच्यासह शालिकराम कुकडे अध्यक्ष, बावणे कुणबी समाज, नागपूर, सदानंद इलमे अध्यक्ष, बावणे कुणबी समाज, भंडारा, किसन शेंडे कार्याध्यक्ष, बाळकृष्ण सार्वे ओबीसी जागृती मंच, बाबा पाटेकर, महेंद्र निंबार्ते संघटन सचिव,  अनंत भारसाकळे  संयोजक महाराष्ट्र राज्य कुणबी कृती समिती, किशोर येडे खैरे कुणबी समाज, मोरेश्वर फुंडे झाडे कुणबी समाज, राजु शिवनकर, राजेश चुटे अध्यक्ष झाडे कुणबी समाज नागपूर, सौ. ऐश्वर्याताई चुटे, बाळाभाऊ शिंगणे संयोजक महाराष्ट्र राज्य कुणबी कृती समिती, क्षितिज ढोबळे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून वारकरी, कुणबी-ओबीसी समाज आणि शिव-शंभू प्रेमींच्या भावनांचा आदर करावा, अन्यथा जनआक्रोश निर्माण होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post