DNA न्यूज़:गोंदिया
जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उष्माघातापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग गोंदिया यांच्या वतीने “उष्माघातापासून वाचा, आरोग्य जपा” या जनजागृती मोहिमेअंतर्गत नागरिकांना विविध प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यात येत आहे.
डॉ. अभिजीत गोल्हार यांनी सांगितले की, सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असून लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला तसेच गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना उष्माघाताचा धोका अधिक असतो. योग्य वेळी काळजी घेतल्यास उष्माघात टाळता येऊ शकतो.
त्यांनी नागरिकांना दिवसभर पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देत तहान लागण्याची वाट न पाहता नियमित पाणी पिणे आवश्यक असल्याचे सांगितले. उन्हात बाहेर पडताना छत्री, टोपी किंवा अंग झाकणारे हलक्या रंगाचे सैल कपडे वापरावेत. दुपारी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत शक्यतो बाहेरील कामे टाळावीत व सावलीच्या ठिकाणी विश्रांती घ्यावी. तसेच लिंबूपाणी, ताक, ओआरएस यांसारख्या द्रव पदार्थांचे सेवन करून शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढावी, असेही त्यांनी नमूद केले.
उष्माघाताची लक्षणे म्हणून जास्त ताप येणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, उलटी, तोंड कोरडे पडणे, जास्त तहान लागणे, अशक्तपणा किंवा बेशुद्ध पडणे यांचा समावेश होतो. अशी लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीला तात्काळ थंड व सावलीच्या ठिकाणी हलवून पाणी द्यावे आणि शरीर थंड करण्याचा प्रयत्न करावा. गंभीर परिस्थितीत त्वरित १०८ आपत्कालीन सेवेशी संपर्क साधावा किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
“उन्हाळ्यात प्रत्येक नागरिकाने स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. सावध राहा, सुरक्षित राहा आणि उष्माघातापासून बचाव करा,” असा संदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी दिला.
إرسال تعليق