ट्रकच्या दोरीला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह; शरीरावर जखमा आणि रक्ताचे डाग आढळल्याने घातपाताचा संशयDNA न्यूज़ गोंदिया

           DNA न्यूज़ गोंदिया 
आमगाव :- गोंदिया-आमगाव मार्गावरील ठाणा गावाजवळ एका ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ट्रकच्या दोरीला गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला. मात्र मृताच्या शरीरावर जखमा तसेच रक्ताचे डाग आढळल्याने हा प्रकार आत्महत्या नसून घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मृत चालकाचे नाव केशव उके (वय २५, रा. बारबती, जिल्हा सिवनी, मध्यप्रदेश) असे असून तो ट्रक चालक म्हणून काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रकमध्ये गुळ भरलेला होता आणि तो माल नागपूर येथे पोहोचवायचा होता. मात्र नागपूरकडे जाणारा ट्रक गोंदिया जिल्ह्यातील ठाणा गाव परिसरात कसा पोहोचला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
घटनास्थळी ट्रकच्या दोरीला बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. तसेच मृताच्या पायावर आणि गळ्यावर जखमांचे निशाण दिसून आले. शरीरावर रक्त पडल्याचेही निदर्शनास आल्याने या घटनेबाबत संशय अधिक गडद झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आत्महत्या की घातपात, या दोन्ही शक्यतांवर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post