DNA न्यूज गोंदिया :
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परसटोला येथे शेतीच्या वादातून सख्ख्या भावानेच मोठ्या भावाचा कुर्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १७ जून) सकाळी घडली. या प्रकरणी केशोरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृतक मोहन मंगरू कवडो (वय ४७) व आरोपी नारायण मंगरू कवडो (वय ४४) हे परसटोला (ता. अर्जुनी मोर, जि. गोंदिया) येथील सख्खे भाऊ आहेत. वडिलांनी दोन्ही भावांना शेतीची वाटणी करून दिली होती. मात्र वडिलांचा सांभाळ मृतक करत असल्याने त्यांच्या हिस्स्यातील चार बांद्या मृतक पेरत होता.
बुधवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास परसटोला शेतशिवारात दोघांमध्ये वडिलांच्या हिस्स्यातील शेतीवरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी नारायण कवडो याने कुर्हाडीने मोहन कवडो यांच्या दोन्ही पायांवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या मोहन कवडो यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेची फिर्याद मृतकाची पत्नी कविता मोहन कवडो (वय ४०) यांनी दिली. त्यांच्या तक्रारीवरून केशोरी पोलीस ठाण्यात अप.क्र. १०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परस्तोला परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे
Post a Comment