गोंदिया जिल्ह्यातील २६९२० संशयीतांची होणार तपासणी - ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान : १५४ पथकांचा समावेश

 


गोंदिया जिल्ह्यातील २६९२० संशयीतांची होणार तपासणी -  ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान : १५४ पथकांचा समावेश 

दबंग न्यूज़ एजेंसी गोंदिया
 
शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यात ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच ‘कुसुम’ विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील १८५ अतिसंवेदनशील भागातील २६ हजार ९२० कुष्ठरोग संशयीत नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून त्याचे निदान व उपचार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडून प्रत्येकी दोन अधिकारी व कर्मचारी असलेले १५४ पथक तयार करण्यात आले आहे. 
 
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अंतर्गत ‘कुसुम’ विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील ४८ आश्रमशाळा, ४५ निवासी वसतीगृह, ३६ विटाभट्टी, १८ स्थलातंरीत ठिकाणे, ३ खाण, ३५ विशेष अति जोखमीचे ठिकाण अशा १८५ अतिसंवेदनशील भागामध्ये या मोहिमेंतर्गत २६ हजार ९२० नागरिकांची १५४ पथकांकडून आशा व पुरुष स्वंयसेवकांच्या मदतीने तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी संशयित रुग्णांचे निदान व उपचार सुरू करून संसर्गाची साखळी खंडित करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच सहवासितांची तपासणी करून पात्र व्यक्तींना प्रतिबंधात्मक औषधोपचार (पीईपी) (किमोप्रोफायलॅक्सिस) देण्यात येणार आहेत.
कोट...
 
शाश्वत विकास ध्येय २०२७ अंतर्गत शून्य कुष्ठरोग प्रसार साध्य करण्यासाठी ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे नियमित सर्वेक्षणातून स्थलांतरित कामगार, बांधकाम मजूर, चिरेखाण कामगार, कारखान्यातील कामगार, कारागृहातील कैदी, आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थी, साखर व धान मिल कामगार आदी वंचित घटकांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
- डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गोंदिया 

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post