DNA न्यूज़। गोंदिया
४०४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या हिंदू-मुस्लीम सलोख्याचे प्रतिक असलेल्या प्रतापगड येथील ऐतिहासिक यात्रेला येत्या रविवार (दि.१५) पासून प्रारंभहोत आहे.या निसर्गसंपन्न परिसरातील यात्रेला महाराष्ट्राबरोबरच, शेजारील छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश व बिहार राज्यांतूनही लाखो भाविक हजेरी लावतात.आठवड्याभर येथे नवस फेडण्यासाठी व भोळ्या शंकराच्या चरणी माथा टेकण्यासाठी दरवर्षी भाविक येत असतात.
डोंगराच्या पायथ्यापासून ७ किलोमिटर उंचीवर प्रतापगडच्या एका दरीत भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात नवस फेडणे, पूजाअर्चना भाविकगण करतात. पूर्वीच्या काळात येथे बैलगाडी, खाचर, दमण्या तर, कधी अनेक दिवसांचा पायी प्रवास करून पोहा महादेवाच्या दर्शनाला येत होता. आता आधुनिक युगात साधनांची रेलचेल झाली आहे. तरीही महाशिवरात्रीच्या वेळी डोंगर दऱ्यांत हर बोला हरहर महादेव असा जय-जयकार निनादत आहे. पूर्वी हे ठिकाण देवगडच्या गोंड राजांची राजधानी होती.१८४२ फूट उंचीवर नवेगाव-प्रतागड पर्वत रांगेत गोंड राजा बख्त बुलंद शहा यांनी हा किल्ला बांधला होता. प्रतापगड या गावाला वेढलेल्या पर्वतराजीची उत्तुंग उंची आणि वनराईने मारलेली मिठी हे या परिसराचे वैशिष्ट्ये आहे.
गोंदियापासून ८५ किमी दूर असलेले हे यात्रास्थान गोंड राजाच्या या प्रतापगड किल्यावर नंतर नागपूरचे रघुजीराजे भोसले यांनी वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांचा दिवाण राजा खान हा येथील कारभार पहात असे.तो सहानगड (सानगडी) या किल्ल्यावरून येथील कारभार पहात असे. या किल्ल्यावर एक भुयारी मार्ग आहे. तो सानगडी पर्यंत, तर, काही गोंडराजाची राजधानी चाँदगड म्हणजे चंद्रपूरच्या किल्ल्यापर्यंत असल्याचे सांगतात. गोंड राजानी स्थानिक भक्कम सुरक्षित ठिकाण म्हणून या किल्ल्यासाठी निवड केली. प्रतापगड पर्वताच्या बाजूला संत ख्वाजा उस्मान गनी हारूनी यांचा दर्गा आहे. हे संत ६०० वर्षांपूर्वी या ठिकाणी वास्तव्य करीत होते. असे मुस्लिम जाणकार सांगतात.एका टेकडीच्या बाजूला एका खोल गुहेत भगवान शंकराची प्राचीन मूर्ती व शिवलिंग उत्खननात सापडल्याची नोंद आहे.या पवित्र स्थळीही यात्रा भरते.
मुस्लिम राज्यकत्यांच्या साम्राज्याच्या अस्तित्वाने, हिंदूधर्माच्या पुनरुत्थानाने, स्थानिक सत्तेच्या प्रभावामुळे पवित्र दर्गा व शिवमंदीर या हिंदू-मुस्लीम ऐक्याचे व दोन्ही धर्मियांचे प्रतापगड हे श्रद्धास्थान बनले. या ठिकाणाला भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.गुहेच्या बाहेर २० फूट उंचीची विशालकाय शिवप्रतिमा ही भाविकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. प्रतापगड गावाच्या उत्तरेस १२ फूट उंचीचे २० बाय २० क्षेत्रफळाचा चबुतरा असलेले बालाजी स्तंभउभारलेला आहे. त्याचे शिखर दैत्यांच्या मूर्तीन कोरुन सजविला आहे. प्रतापगड हे गाव गाढवी नदीच्या प्रवाहाजवळ वसलेले आहे. मुस्लीम-हिंदू बांधवाच्या वतिने सांस्कृतीक व धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याबरोबरच येथे येणारा प्रत्येक भावीक जाताना आपल्या अंतःकरणात जातांना सामाजिक ऐक्याचा संदेश घेऊन जाणार आहेत.अशी ही हिंदू-मुस्लिम जातीय सलोखा व सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ही यात्रा आठवडाभर चालणार आहे.
👉वैभवाची साक्ष देणारा भग्न किल्ला
आता जीर्ण अवस्थेत असलेला हा किल्ला राक्षसाची कावड, सीतेची न्हाणी, धान्याचे कोठार, अस्तबलाचे अवशेष, ढासळलेली तटबंदी, ढासळलेले बुरुज, पडक्या अवस्थेत असलेली भक्कम तटबंदी व उंच पर्वतराजीवर बांधलेला हा किल्ला चढाई करण्यास कठीण आहे. हा प्रतापगड किल्ला आजही आपल्या गत इतिहासाची व वैभवाची साक्ष देत भग्नावस्थेत उभा आहे.
👉गाढवी नदीचा उगम
गाढवी नदीचे गाढवी नाव नदी असे नाव का पडले याची एक दंतकथा सांगितली जाते. गर्ग ऋषीच्या प्रार्थनेनुसार पूर्वेकडून एक नदी प्रकट झाली. परंतु, या नदीचा प्रवाह मंद गतीचा असल्यामुळे गर्ग ऋषीला क्रोध आला. त्यांनी क्रोधीत होउन या नदीला तू भविष्यात गाढवी हो, असा शाप दिला. नंतर या नदीला गाढवी या नावाने ओळखले जाऊ लागले. शिघ्रकोपी गर्ग ऋषी व गाढवी नदी यांच्या नामाचा संबंध जोडला जातो.
👉इको टुरिझमचे वैशिष्ट्ये
प्रतापगडचे शिवमंदीर, मुस्लिम बांधवांचे श्रध्दास्थान असलेले ख्वाजा उस्मान गनी हारुनी दर्गा व शरणार्थी तिबेटियन वसाहतीतील बुद्धविहार हे या परिसरातील धर्मनिरपेक्षतेचे स्थळे या परिसराचे वैशिष्ट्ये आहे. भाविक व इतिहासाची आवड असलेल्यांसाठी विदर्भातील हे स्थळ एक आनंदाची पर्वणीच आहे. यात्रे निमित्ताने येणाऱ्यांसाठी प्राचीन शिवमंदीर, ख्वाजा उस्मानगनी हारूनी यांचा दर्गा, बालाजी स्तंभ, प्रतापगड किल्ला, तिबेटीयन वसाहतीतील बुद्ध बिहार, इटीयाडोह धरण, नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व चारभट्टी येथील जागरुक हनुमानाचे मंदिर असा भक्ती व पर्यटनाचा सुंदर संगम येथे आहे.या यात्रेच्या निमित्ताने येथे जातीय सलोखा व सामाजिक ऐक्याचे दर्शन भाविकांना व पर्यटकांना घडणार आहे.
👉प्रशासनाची सुसज्जता
यात्रा सुरळीत पार पडावी व यात्रेकरूंना कसल्याही प्रकारचा त्रास या ठीकाणी होऊ नये.यासाठी जिल्हाधिकारी गोंदिया व तालुका प्रशासनाच्या वतीने बैठका घेऊन महसुल, वन, आरोग्य, पाटबंधारे,पोलीस या विभागांकडून पायाभूत सुविधा व यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सुसज्ज व्यवस्था केली आहे.साकोली,पवनी,गोंदिया या बस स्थानकावरून प्रतापगड यात्रेसाठी दर तासांनी अर्जुनी मोरगाव वरून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
إرسال تعليق