DNA न्यूज़ ।गोंदिया
गोंदिया, –कोणतेही कारण नसताना शाळेच्या पटांगणात खेळत असलेल्या पाचव्या वर्गातील विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षिकेने वर्गखोलीत नेऊन बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना आमगाव तालुक्यातील गोरठा येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी काल बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांच्या आईच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसात सदर शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धैर्य मनोज मिश्रा (१२) रा. गोरठा असे त्या मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. धैर्याच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार धैर्य हा आपल्या मित्रासोबत शाळेच्या ग्राउंडमध्ये खेळत असताना त्याने सहपाठी मित्राला ‘लॉलीपॉप’ मागितले. यावेळी शेजारून जात असलेल्या संबंधित शिक्षिकेने हे ऐकून धैर्यला सहाव्या वर्गात नेत त्याला कोणतेही कारण नसताना हाताबुक्क्यांनी तसेच बासाच्या काठीने पाठीवर छातीवर व हातावर बेदम मारहाण केली. यामुळे धैर्यच्या अंगावर मारण्याचे व्रण येऊन तो जखमी झाला.घटनेनंतर वर्गमित्रांनी धैर्यला घरी आणून सोडले. दरम्यान धैर्यची आई रानी मनोज मिश्रा (३२) ह्या सायंकाळी शेतातून घरी आल्यावर त्याचा लहान भाऊ इयान मिश्रा याने शाळेत घडलेला प्रकार आईला सांगितला. यावेळी त्याच्या आईने पाहणी केली असता त्यांना धैर्यच्या पाठीवर व्रण उमटलेले दिसून आले. यावर त्यांनी बुधवारी दुपारी आमगाव पोलिस ठाणे गाठून संबंधित शिक्षकेविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे आमगाव पोलिसांनी शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार राजू गजापूरे करीत आहेत.
إرسال تعليق