महिला महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यातDNA न्यूज गोंदिया

              DNA न्यूज गोंदिया 
गोंदिया : तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक (वर्ग 3) यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवार, १७ जून रोजी करण्यात आली. शालू कमलेश कावळे (वय ३८) अशी आरोपीची नावे आहेत. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भारतीय नौदलाचे माजी सैनिक तसेच पोलीस विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक आहेत. माजी सैनिक असल्याने ग्राम तेढवा (ता. गोंदिया) येथील सिलिंगची जमीन त्यांच्या नावावर करून देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र कृषी जमीन कमाल धारणा अधिनियम १९६१ अंतर्गत तहसीलदार, गोंदिया यांच्याकडे अर्ज केला होता. सदर अर्जावर कार्यवाही करून जमीन नावावर करून देण्यासाठी महसूल सहाय्यक शालू कावळे यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार १६ जून रोजी एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपीने ५० हजार रुपयांपैकी १० हजार रुपये आगाऊ रक्कम म्हणून मागितल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित ४० हजार रुपये काम पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु, तक्रारकर्त्याला लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी याची तक्रार गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केली. त्यानुसार १७ जून रोजी एसीबीने सापळा रचला. गोंदिया तहसील कार्यालयात तक्रारदारांकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक शालू कावळे यांना रंगेहात पकडण्यात आले. आरोपीच्या अंगझडतीदरम्यान १० हजार रुपयांची लाच रक्कम जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या ताब्यातील व्हिवो कंपनीचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अरविंद राऊत करत आहेत.

यांनी केली कारवाई…
ही कारवाई ACB चे पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनात ASI चंद्रकांत करपे, हेड कॉन्स्टेबल संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, पोलिस नायक संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवणे, कैलास काटकर, दीपक बाटबर्वे, रोहिणी डांगे यांनी केली.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post