DNA न्यूज नेटवर्क गोंदिया
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील
पिंपळगाव-खांबी येथे गुरुवा[री सकाळी सुमारे ५.३० वाजताच्या दरम्यान काही नागरिकांना गावातील शाळेच्या आवारात बिबट दिसून आला. बिबट दिसताच नागरिकांनी आरडाओरडा केल्याने तो तेथून निसटला. त्यानंतर काही वेळातच तो लांजेवार यांच्या घरात शिरल्याचे निदर्शनास आले. घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत सर्व दरवाजे बंद करून स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित केली.
बिबट्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी लांजेवार यांच्या घराकडे मोठी गर्दी केली. मात्र गर्दीचा फायदा घेत बिबट पुन्हा तेथून निसटला. त्यानंतर तो बोरकर यांच्या घराजवळील शौचालय परिसरात दिसून आला. यावेळी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली.
यानंतर बिबट मेश्राम यांच्या घराजवळील एका पडक्या घराच्या परिसरात दिसून आला. वनविभागाने त्या ठिकाणी रेस्क्यूसाठी प्रयत्न केले, मात्र बिबट पुन्हा तेथून निसटण्यात यशस्वी झाला. त्यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी जाळे व इतर आवश्यक साहित्य परिसरात तैनात केले. मात्र बिबट पुन्हा तेथून निसटून होमराज मेंढे यांच्या घराच्या दिशेने गेला. अखेर वनविभागाच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आणि सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश आले.
वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेली बिबट ही अंदाजे दोन वर्षांची मादी असून तिची प्रकृती चांगली आहे. आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर तिला योग्य अधिवासात सोडण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
दरम्यान, बिबट पाहण्यासाठी पिंपळगाव-खांबी तसेच परिसरातील गावांमधून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार कमलेश सोनटक्के हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी उपस्थित होते.
या यशस्वी रेस्क्यू मोहिमेत नवेगावबांध वनपरिक्षेत्र अधिकारी मारबते, सहाय्यक वनसंरक्षक (ACF) अविनाश मेश्राम, बाराभाटी बिटच्या चादेवार मॅडम, RRT गोंदिया टीम, नवेगावबांध रेस्क्यू टीमचे सतीश शेदरे, अमोल चौबे, विक्रांत ब्राम्हणकर, अमित राऊत, राजेश ढोक तसेच PRT टीमचे सदस्य आणि बाराभाटी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बोकडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
إرسال تعليق