No title

राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘निसर्ग शिक्षण’
- वन्यजीव संवर्धनासाठी शासनाचा पुढाकार
- सीमावर्ती शाळांतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी मोफत शैक्षणिक सहल
गोंदिया, 11 जुलै
वन, वन्यजीव आणि जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये शालेय निसर्ग शिक्षण व वन्यजीव जनजागृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या उपक्रमांतर्गत व्याघ्र प्रकल्पांच्या हद्दीत किंवा सीमारेषेपासून दोन किलोमीटरच्या परिसरातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी एक विनामूल्य शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येणार आहे. यात जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच मान्यताप्राप्त खासगी शाळांचा समावेश राहणार असून, विद्यार्थ्यांची निवड संबंधित शाळेच्या इको-क्लबमार्फत केली जाणार आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) कार्यालयाकडून 9 जुलै रोजी दिलेल्या पत्रकानुसार वन्यजीव संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधतेबाबत रुची असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार असून सहलीसाठी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची संपूर्ण व्यवस्था संबंधित व्याघ्र प्रकल्पामार्फत विनामूल्य करण्यात येणार आहे. दरम्यान, 20 ते 30 विद्यार्थ्यांच्या क्षमतेची बस किंवा मिनीबस उपलब्ध करून दिली जाणार असताना यासाठी विद्यार्थी अथवा शाळांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. शैक्षणिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांसह जंगल सफारी किंवा निसर्गभ्रमंती, निसर्ग माहिती केंद्रांना भेट, वन अधिकारी व कर्मचार्‍यांशी संवाद, शैक्षणिक माहितीपटांचे प्रदर्शन, प्रश्नमंजुषा, पोस्टर स्पर्धा तसेच जैवविविधता आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्वावरील विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी क्षेत्र संचालकांनी शिक्षण विभाग, इको-क्लब, शैक्षणिक संस्था व स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाने वार्षिक कृती आराखडा तयार करून त्यामध्ये सहभागी शाळांची यादी, शैक्षणिक भेटींचे वेळापत्रक आणि लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
कोट..
उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संवर्धनाबाबत जबाबदारीची भावना निर्माण करून पर्यावरणपूरक आणि संवर्धनासाठी सक्रिय नागरिकांची नवी पिढी घडविण्याचा शासनाचा उद्देश आहे. दरम्यान, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत गेल्यावर्षीपासूनच या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून गेल्या वर्षी 16 शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात आले तर यंदा 52 शाळांचा समावेश करण्यात आला असून 2 हजार 600 विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
- प्रितमसींग कोडापे, उपसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, गोंदिया 
....

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post