नगर परिषदेलाच नोटीसची गरज!
- ६८ धोकादायक इमारतींना नोटिसा; मात्र नगर परिषद कार्यालयासह १२ शाळांच्या जीर्ण इमारतींकडे दुर्लक्ष
गोंदिया, ९ जुलै
शहरातील धोकादायक व जीर्ण इमारतींवर कारवाई करत संबंधित मालकांना नोटिसा बजावणाऱ्या नगर परिषदेची स्वतःचीच इमारत आज अत्यंत जीर्ण अवस्थेत असून ती कधीही दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे "इतरांना नोटीस देण्यापूर्वी स्वतःची इमारत सुरक्षित करा," अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
नगर परिषदेच्या सर्वेक्षणानुसार शहरात ६८ इमारती धोकादायक व जीर्ण अवस्थेत असून संबंधित मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, ज्या नगर परिषदेतून या नोटिसा निघतात, त्याच कार्यालयाच्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. छत, स्लॅब आणि भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले असून इमारतीतील काही भाग धोकादायक बनला आहे. त्यामुळे येथे कार्यरत अधिकारी-कर्मचारी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या शेकडो नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन नगर परिषदेचे काही विभाग शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम परिसरातील इमारतीत हलविण्यात आल्याची माहिती आहे. तरीदेखील अनेक विभाग अद्यापही जीर्ण इमारतीतूनच सुरू असल्याने सुरक्षेचा प्रश्न कायम आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे नगर परिषदेच्या अखत्यारीतील १४ शाळांपैकी तब्बल १२ शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने संबंधित इमारतींच्या दुरुस्तीचा तसेच नव्या इमारती उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याचे सांगितले जाते. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
एका बाजूला नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जीर्ण इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला जात असताना दुसऱ्या बाजूला नगर परिषदेच्या स्वतःच्या इमारती आणि शाळांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी नगर परिषदेच्या इमारतींसह शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
आज जीर्ण इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावणाऱ्या नगर परिषदेलाच आता नोटीस बजावण्याची वेळ आली आहे का, असा सवाल उपस्थित होत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
Post a Comment