नाकाबंदीदरम्यान खाकीचा माणुसकीचा हात गोरेगाव-ठाणा मार्गावरील जीवघेणे खड्डे बुजवून पोलिसांनी जिंकली नागरिकांची मने सारस एक्सप्रेस गोंदिया

      सारस एक्सप्रेस गोंदिया    
पोलीस प्रशासनावर अनेकदा कठोर कारवाईमुळे टीका होत असते. मात्र गोरेगाव पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत नागरिकांसाठी आदर्श निर्माण केला आहे. नाकाबंदीदरम्यान गोरेगाव-ठाणा मार्गावरील जीवघेणे खड्डे स्वतःच्या पुढाकाराने बुजवून संभाव्य अपघात टाळण्याचा स्तुत्य उपक्रम राबविल्याने पोलिसांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गोरेगाव-ठाणा मार्गावरील पांगोली नदी परिसरात मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले असून काहींना जीवही गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या मार्गाची दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असतानाही वारंवार मागणी करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते दुसऱ्याच दिवशी उखडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.
दरम्यान, गोरेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक हिना मुल्ला, सहाय्यक फौजदार मुनेश्वर राऊत, हेड कॉन्स्टेबल श्रीकांत धारगावे आणि पोलीस शिपाई लिलाधर चुटे हे पांगोली नदी परिसरात नाकाबंदी करत असताना वाहनचालकांना खड्ड्यांमुळे होणारा त्रास आणि अपघाताचा धोका त्यांच्या निदर्शनास आला. यानंतर त्यांनी पुढाकार घेत स्वतःच्या खर्चातून जेसीबीच्या साहाय्याने मार्गावरील खड्डे बुजविण्याची व्यवस्था केली.
या उपक्रमामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून पोलिसांच्या या संवेदनशील आणि लोकाभिमुख कार्याचे नागरिकांकडून तसेच विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
 प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप
गोरेगाव-ठाणा मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असतानाही संबंधित विभागाकडून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून या मार्गाची तातडीने दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم