DNA न्यूज़ नेटवर्क गोंदिया :
विधान परिषद सदस्य तथा माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत १४ जुलै रोजी गोंदिया जिल्ह्यातील विविध प्रलंबित समस्यांबाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती संघटनेने दिला होता. या आंदोलनाची प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. गोंदियाचे जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या सूचनेनुसार, निवासी जिल्हाधिकारी भैयासाहेब बहिरे यांच्या दालनात प्रहार संघटनेचे शिष्टमंडळ आणि सर्व संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची एक तातडीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत निवेदनातील विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करून त्यावर तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
या बैठकीत प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर आणि जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर जिल्ह्यातील जनतेला भेडसावणाऱ्या तीव्र
समस्यांचा पाढा वाचला. यामध्ये प्रामुख्याने 'लाडकी बहीण योजने'चे पैसे अनेक पात्र महिलांना तांत्रिक अडचणींमुळे मिळत नसल्याचा मुद्दा लावून धरण्यात आला.
शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी २४ तास अखंडित विद्युत पुरवठा करण्यात यावा आणि घरगुती वीज वारंवार खंडित होण्याचा प्रकार थांबवावा, सोलर कृषी कनेक्शन मधील त्रुटी दूर करणे आणि नागरिकांमध्ये असंतोष असलेल्या स्मार्ट मीटरच्या समस्येवर तोडगा काढणे, जिल्ह्यातील हजारो बिडी कामगारांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबत तात्काळ पावले उचलणे, अदानी कंपनीच्या ओव्हरलोड राख व कोळशाच्या वाहतुकीमुळे होणाऱ्या तीव्र प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे, देवरी तालुक्यातील इथेनॉल प्रकल्पासाठी जाणाऱ्या पाण्याचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी अडवण्यास
विरोध करणे, शेतकऱ्यांना धानाचा थकीत बोनस, शेतमालाला योग्य हमीभाव आणि धानाचे चुकारे तात्काळ मिळवून देणे, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना आणि मृत पशुधनाच्या नुकसानभरपाईच्या अनुदानात वाढ करून, ती रक्कम १ महिन्याच्या आत देणे बंधनकारक करणे आदि विविध मागण्या व समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी सर्व संबंधित विभागाच्या प्रमुखांना पाचारण करून प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. या महत्वपूर्ण बैठकीच्या वेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी यांच्यासह गोंदिया प्रहारचे जिल्हाध्यक्ष पिंटू बावनकर व संघटक बिसेन प्रामुख्याने उपस्थित होते.
Post a Comment