DNA न्यूज़।गोंदिया महाराष्ट्र
आजच्या डिजिटल आणि सोशल मीडियाच्या वेगाच्या युगात माहितीचे अनेक स्रोत निर्माण झाले असले, तरी प्रिंट मीडियाने आपली विश्वासार्हता आणि प्रामाणिक पत्रकारितेचा वारसा आजही जपला आहे. वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होणारा शब्द हा आजही समाजासाठी सत्य आणि अधिकृत मानला जातो, असे गौरवद्गार गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी काढले. गोंदिया जिल्हा मराठी पत्रकार संघ शाखा गोरेगावच्या वतीने सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी गोरेगाव येथील शर्माजी गेस्ट हाऊस येथे ‘मीडिया नवरत्न अवॉर्ड २०२५-२६’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प. सभापती डॉ. लक्ष्मण भगत, माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष इंजि. आनंद चंद्रिकापुरे, नगराध्यक्ष तेजराम बिसेन, उपाध्यक्ष मलेश्याम येरोला यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तत्पूर्वी, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन आयोजनाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. यासोहळ्याला माजी आ. हेमंत पटले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे, पं. स. सभापती चित्रकला चौधरी, उपसभापती रामेश्वर महारवाडे, राकाँ तालुकाध्यक्ष केवलराम बघेले, नगरसेवक सुरेश रहांगडाले, न.पं. सभापती रंजना बारेवार, इसुलाल सोनवाने, अजय कोठेवार, भाकपा राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, माजी जि.प. सभापती विश्वजीत डोंगरे, समर्थ एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्रमोद बिसेन, वृत्तपत्र विक्रेता संघाचे राज्य उपाध्यक्ष दिनेश उके, रंजित सरोजकर उपस्थित होते. पुढे बोलताना रहांगडाले यांनी, सोशल मीडियावर अनेकदा अफवा आणि अपूर्ण माहिती वेगाने पसरते, ज्याची कोणतीही जबाबदारी नसते. मात्र, प्रिंट मीडियामध्ये बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी तिची सखोल पडताळणी आणि कायदेशीर बाजू तपासली जाते. हीच ’प्रामाणिक पत्रकारिता’ प्रिंट मीडियाची खरी ताकद असल्याचे सांगून मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित या पुरस्कार सोहळ्यामुळे समाजात कार्य करणार्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगितले. यावेळी माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष चंद्रिकापूरे यांनी पत्रकारांनी नेहमीच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपली भूमिका चोख बजावली असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याचे काम केले असल्याचे सांगत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा ’मीडिया नवरत्न’ पुरस्काराने गौरव करणे, हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे नमूद केले. प्रसंगी नगरसेवक सुरेश रहांगडाले यांनी संघाच्या कार्यालयाकरीता ५०० चौरसफुट जमीन भेट देत असल्याचे घोषित केले. यावेळी राकाँ तालुका अध्यक्ष केवळराम बघेले यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या निधीतून ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे अश्वासन दिले. तर जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे यांनी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. यावेळी नगराध्यक्ष तेजराम बिसेन,उपाध्यक्ष मलेश्याम येरोला, जि. प. सभापती डॉ. लक्ष्मण भगत यांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान, विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या नऊ मान्यवरांचा पाहूण्यांच्या हस्ते मिडीया नवरत्न अवार्ड देऊन सन्मान करण्यात आला. ज्यामध्ये दुर्गाप्रसाद ठाकरे यांना उद्योग रत्न, कांता साखरे यांना लोकसेवक रत्न, डॉ. संदीप वाघमारे यांना आरोग्य रत्न, सुरेंद्र बिसेन यांना कृषी रत्न, टोलीराम बघेले महाराज यांना समाज रत्न, डिलेश्वर पंधराम यांना पत्रकार रत्न, श्री. दुर्गा माता उत्सव समिती, गोरेगावला सेवा समिती रत्न, जि.प. शाळा सोनेगावला शिक्षण रत्न, व गुन्हेगारी मुक्त गाव रत्न पुरस्काराने महसूली गाव बागळबंधला सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष भरत घासले यांनी केले. तर संचालन प्रमोद नागनाथे व देवेंद्र रहांगडाले यांनी केले. उपस्थितांचे आभार दिलीप चव्हाण यांनी मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
إرسال تعليق