किडंगीपार दारूबंदीच्या मागणीला घेऊन आंदोलक आक्रमक - पोलिसांशी धक्काबुक्की : नोटीसफाडल्याप्रकरणी आंदोलक कुटूंबावरगुन्हा दाखलDNA न्यूज़ गोंदिया

           DNA न्यूज़ गोंदिया 
आमगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या किडंगीपार येथील दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीने आता अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. प्रशासकीय नोटीस बजावण्यावरून आंदोलक आणि पोलिस यांच्यात झालेल्या तीव्र संघर्षानंतर, मुख्य आंदोलक संतोष दोनोडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेच्या भीतीने हे कुटुंब सध्या फरार झाले असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
किडंगीपार येथील दारू दुकानामुळे ग्रामस्थांचे आरोग्य आणि शांतता धोक्यात आल्याचा आरोप करत समस्त गावकऱ्यांनी २० मार्च रोजी तहसील कार्यालयावर धडक दिली होती. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात १० एप्रिलपर्यंत दारू दुकान बंद न झाल्यास 'रस्ता व रेल्वे रोको' आणि पाच नागरिकांच्या 'सामूहिक आत्मदहनाचा' इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाचे नेतृत्व संतोष दोनोडे यांच्यासह अन्य महिला आंदोलक करत आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस पथक ५ एप्रिल रोजी प्रतिबंधात्मक कारवाईची (कलम १६८) नोटीस बजावण्यासाठी संतोष दोनोडे यांच्या घरी गेले होते. महिला पोलिस कर्मचारी आणि दोन हवालदार उपस्थित असताना, दोनोडे यांनी नोटीस स्विकारण्यास नकार देत पोलिसांसमोरच नोटीस फाडून त्यांना घराबाहेर ढकलले.
दरम्यान, शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांशी गैरवर्तन केल्याबद्दल संतोष दोनोडे, त्यांची पत्नी आणि मुलीवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आज, ६ एप्रिल रोजी त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी धाड टाकली असता संपूर्ण कुटुंब फरार झाल्याचे निष्पन्न झाले. एकिकडे दारू बंदीसाठी संपूर्ण गाव आक्रमक असताना, दुसरीकडे कायदेशीर गुन्ह्यांमुळे आंदोलनाला गालबोट लागले आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून किडंगीपार परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم