नवेगाव-नागझिरा अभयारण्य निसर्गाची अद्भूत देणDNA न्यूज़ गोंदिया महाराष्ट्र

        DNA न्यूज़ गोंदिया महाराष्ट्र 
महाराष्ट्राच्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यांमध्ये विस्तारलेले घनदाट जंगलामध्ये वसलेले नवेगाव-नागझिरा वन्यजीव अभयारण्य निसर्गप्रेमी आणि वन्यजीव निरीक्षकांसाठी एक पर्वणीच आहे. गोंदिया जिल्ह्याचा 70 % व भंडारा जिल्ह्याचा 30 % भाग या अभयारण्यात विस्तारलेला आहे. हे अभयारण्य पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. निसर्गदृष्ट्या मोहून टाकणारे जंगल, समृध्द जैवविविधता आणि वन्यजीव यामुळे नवेगाव-नागझिरा हे निसर्गाच्या सहवासाचा आस्वाद घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी अविस्मरणीय अनुभव ठरते.
        नागझिरा वन्यजीव अभयारण्याला भेट देणे म्हणजे निसर्गाच्या सौंदर्यात रममाण होण्याचा एक अनोखा प्रवास आहे. येथील विस्मयकारक निसर्गरम्यता, अद्भुत वन्यजीव आणि शांततेचा अनुपम अनुभव आपल्याला मंत्रमुग्ध करते.
          नवेगाव-नागझिरा अभयारण्य हे शाश्वत इको-टुरिझमसाठी महत्वाचे केंद्र आहे. येथे वनसंवर्धनाचे विविध उपक्रम राबविले जातात. जसे- चितमपल्ली निसर्ग शाळा, जैवविविधतेचे महत्व समजावणे आणि संरक्षण उपक्रमांमध्ये स्थानिकांचा सक्रीय सहभाग वाढवणे यावर भर दिला जातो. या ठिकाणी शिकारींपासून वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. तसेच वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करण्यात आले आहे. या सर्व प्रयत्नांमुळे नागझिरा अभयारण्य वन्यजीव संवर्धनाचे एक आदर्श उदाहरण ठरत आहे.
          सौम्य उताराच्या टेकड्या, खोल दऱ्या व नितळ पाण्याच्या प्रवाहांनी युक्त अशा या अभयारण्याच्या मध्यभागी प्राचीन ‘नाग मंदिर’ आहे. ‘झिरा’ या मराठी शब्दाचा अर्थ शाश्वत जलस्त्रोत, यावरुन या ठिकाणाला नागझिरा असे नाव पडले. घनदाट जंगलापासून मोकळ्या कुरणांपर्यंत विविध प्रकारच्या नैसर्गिक वातावरणाचा समावेश असलेले हे अभयारण्य असंख्य वनस्पती आणि प्राण्यांचे आश्रयस्थान आहे. येथील जंगलात सागवान हे सर्वाधिक आढळणारे झाड असून त्यासोबत ऐन, हळदू, धाओरा व बांबू यांची विपुलता आहे.
          या अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्री, गवे, सांबर, चितळ, नीलगाय, बंदर, रानडुक्कर, रानमांजर, चौसिंगा, तडस, कोल्हा, वटवाघूळ, खवले मांजर या प्राण्यांसह अजगर, नाग, घोणस, मण्यार, घोरपड, सरडे असे सरपटणारे 48 प्रजातींचे प्राणी आणि  मोर, गरुड, शिकारी पक्षी तसेच बार-हेडेड गुज यासारखे 125 प्रकारच्या पक्षांच्या प्रजातींचा अधिवास आहे. 
          दिनांक 1 एप्रिल 2026 पासून गाभा (कोर) क्षेत्र व बफर क्षेत्र एकत्रीकरण करण्यात आले असून आता नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रफळ एकूण 1850 चौरस किलोमीटर झालेले आहे. पुर्वी हे क्षेत्र 650 चौ.कि.मी. एवढे  गाभा क्षेत्र होते, आता बफरमध्ये असलेले 1200 चौ.कि.मी. क्षेत्र एकत्रित करण्यात आले आहे. हा निर्णय 2017 मध्येच झालेला होता, मात्र त्याची अंमलबजावणी दिनांक 1 एप्रिल 2026 पासून करण्यात आलेली आहे. यात काही क्षेत्र जंगलाने व्याप्त असून काही क्षेत्र महसूली गावांचे आहे.
           दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी गाभा (कोर) क्षेत्र व बफर क्षेत्र एकत्रीकरण करण्यात आले आहे. या निर्णयामुळे व्याघ्र प्रकल्पाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्या अस्तित्वात असलेल्या प्रवेशद्वारांसह आणखी चार नवे प्रवेशद्वार तयार केले जाणार आहेत. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील पांगडी, जांभळी व मुरदोली आणि भंडारा जिल्ह्यातील गडेगाव डेपो येथे प्रवेशद्वार राहणार आहे. या प्रयत्नांमुळे पर्यटकांना विविध प्रवेशद्वारांमधून सफारी करण्याची संधी मिळणार आहे. व्याघ्र प्रकल्पाचा एकसंघ निर्णयाचा फायदा स्थानिकांना रोजगारासाठी होणार आहे. व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंग, नियमित गस्त, मानव-वन्यजीव संघर्ष निवारण, जलसंधारणाच्या कामांवर भर दिला जात आहे. त्यातून पर्यटनवाढ आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.
          त्यामुळे महाराष्ट्रातील निसर्गप्रेमी पर्यटकांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र येथे जंगल सफारी करण्याकरीता अवश्य भेट द्यावी व निसर्गाचा तसेच वन्यप्राण्यांचा मनसोक्त आनंद घ्यावा.
 संकलन:
कैलाश गजभिये
                                                 जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया

0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم