*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती तातडीने दखल; राज्यातील ३०५ तालुक्यांसाठी मदत उपाययोजनांची तरतूद*
सारस एक्सप्रेस गोंदिया
१४ ऑक्टोबर | गोंदिया. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात राज्यातील ३०५ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याचा यापूर्वीच दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला होता. आता गोंदिया, आमगाव, देवरी, सालेकसा, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी आणि गोरेगाव या उर्वरित सात तालुक्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावेत आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी केली होती. या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तपासणी करण्याचे निर्देश दिले होते.
शासन निर्णयानुसार, प्रभावित भागांमध्ये महसूल वसुलीत सवलत, पीककर्ज वसुलीत सवलत, कृषीपंपांच्या वीजबिलात सूट, विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्कमाफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची उपलब्धता तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा विविध उपाययोजनांची तरतूद करण्यात आली आहे.
यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून संपूर्ण प्रस्ताव कृषी विभागामार्फत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता या मदत उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन पात्र शेतकरी व लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचण्याची प्रतीक्षा आहे.
إرسال تعليق